कराड/प्रतिनिधी : -
कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. “कराडमध्ये महायुती करता येते का, यासाठी मी मित्रपक्षांशी संवाद साधणार असून, लवकरच सर्वांना एकत्र बसून चर्चा करण्याचे निमंत्रण देणार आहे. मात्र, मागच्या वेळेस नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार असल्याने यावेळीही आमचा आग्रह राहणार असल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, शिंदे गटाची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, तसेच इतर आघाड्यांसह बसून गावाच्या विकासासाठी एकत्रित तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. कोणत्याही व्यक्तीने पक्षात प्रवेशासाठी इच्छा दर्शवली, तर जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांना पक्षात घेणे भागच असते. मात्र सलोखा आणि शिस्त राखण्याच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत.
नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये “आमदारांनी शब्द दिला” असा गैरसमज निर्माण केल्याच्या तक्रारींबाबत बोलताना ते म्हणाले, पक्षात उमेदवारी ठरविण्याचा अधिकार फक्त पक्षाचे शिखर नेतृत्व आणि कोअर कमिटी यांच्याकडे आहे. आम्ही कोणालाही शब्द दिलेला नाही. निरीक्षक सर्व इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतील आणि योग्य उमेदवार ठरवतील. काही लोक वॉर्डामध्ये फिरून खोटा प्रचार करत आहेत, ते चुकीचे आहे. वॉर्डामध्ये काम करा, पण उमेदवारीच्या अपेक्षेने नाही, पक्षासाठी करा. पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०१७ च्या निवडणुकीत कराडकरांनी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाला निवडून दिले होते, हे नमूद करत डॉ. भोसले म्हणाले, या वेळीही महायुतीचा नगराध्यक्ष व्हावा आणि तो भाजपाचाच असावा, अशी आमची भूमिका आहे. सध्याचा सिटींग नगराध्यक्ष भाजपाचा असल्याने आम्ही पुन्हा भाजपाचाच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. मित्रपक्षांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
©2026. All Rights Reserved.