ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी
  • Aavaj Daily Team
  • Sat 27th Sep 2025 06:44 pm

कराड/प्रतिनिधी : - 

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. स्वराज्यनिर्मितीच्या त्यांच्या कार्याला जगभरातून मान्यता मिळाली. आग्र्याहून सुटकेच्या घटनेची बातमी तत्कालीन लंडन गॅझेटसारख्या परदेशी वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापून त्यांच्या पराक्रमाचे गौरवगीत गायले होते. त्यामुळे शिवराय हे त्यांच्या हयातीतच जागतिक स्तरावर पोहोचले होते; या गोष्टी त्यांचे शौर्य आणि नेतृत्व सिद्ध करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन पुरातत्व व इतिहास संशोधक केतन पुरी यांनी केले.

कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे आयोजित ९३ व्या व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरअभियंता सुधीर चव्हाण होते. यावेळी माजी नगरसेवक सौरभ पाटील, उपअभियंता सामना गोरे, पत्रकार देवदास मुळे यांची उपस्थिती होती.

पुरी म्हणाले, इतिहासाने शहाजीराजे भोसले यांना स्वराज्य संकल्पक म्हणून संबोधले. परंतु, आदिलशाहीचा एक सरदार असलेल्या शहाजीराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करून त्यास मुघलशाही आणि आदिलशाहीकडून मूळ आदिलशाही राज्य म्हणून कबूलपत्रही घेतले, हीही एक स्वराज्य निर्मितीच होती. मात्र, केवळ राजकारणाचे बळी पडलेल्या शहाजीराजांना दूर कर्नाटकदेशी बंगळूरला जावे लागले. पुणे, सुपे, इंदापूर, बारामती या त्यांच्या मूळ जहागिरीत राहून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला. मुघलशाही आणि आदिलशाहीशी केलेल्या पत्रव्यवहारातून त्यांचा मुस्तुद्दीपणा दिसतो. गनिमी काव्याच्या युद्धनीतीतून स्वराज्यनिर्मिती करत मुघल, आदिलशाहा, कुतुबशाहा, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्या उरावर त्यांनी मराठा साम्राज्य निर्माण केले. सिंहासनाधीश्वर छत्रपती होत मराठी राजा म्हणून जगमान्यता मिळवली, ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे.

दरम्यान, शहाजीराजांच्या कारकिर्दीत मुघल आणि आदिलशाहीत झालेल्या तहामुळे स्वराज्याच्या सीमांचे बंधन, पुरंदर तह आणि आग्रा भेट शिवरायांना करावी लागली, याबाबबतची तपशीलवार माहिती त्यांनी ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून दिली. जावळीच्या मोहिमेनंतर खऱ्या अर्थाने शिवराय मुघल आणि आदिलशहाच्या नजरेत आले. अफझलखान स्वारीत शिवरायांना अपाय झाला असता, तर आजचे चित्रच वेगळे असते, असे सांगत पुरी म्हणाले, जिजाऊंच्या सांगण्यावरून अफझलखानाचा वध करून शिवरायांनी बंधू संभाजींचे उट्टे काढले. मराठी सैन्याने १२००० गानिमांची कत्तल करत हत्ती, घोडे, उंट आणि कोट्यावधींचा खजिना मिळवून प्रतापगड ते पन्हाळगडापर्यंतचा मुलुख स्वराज्यात सामील केला. पन्हाळा वेढ्यावेळी नेताजी पालकर आणि शिवरायांमध्ये झालेली बेदिली, पालकरांची मुघलांशी सलगी, पुन्हा शुद्धीकरणाने स्वराज्यात आगमन, सुरत लुट, शाहिस्तेखानाची कोंडी, संपूर्ण कोकण किनारपट्टी, दक्षिण दिग्विजय मोहीम या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा त्यांनी धावता आढावा घेतला. तसेच राज्याभिषेकावेळी उपस्थित असलेल्या हेनरी ऑक्सिडेनने शिवरायांचे केलेले वर्णन आणि इटालीयन प्रवासी निकोलो मनुची या दोन व्यक्तिमत्वांच्या ऐतिहासिक प्रवासाबाबत कुतूहल असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वराज्य निर्मिती, गडकोटांचे जाळे, न्यायनिवाडा, आरमार निर्मिती, चारित्र्यसंपन्नता, रयत पालक व कृषी धोरणे, राज्याभिषेक, सुवर्ण सिहासन, शिवशकास प्रारंभ, नाणी टांकसाळ, शस्त्रनिर्मिती, जागतिक राजनीती यांमुळे ते श्री राजा शिवछत्रपती झाले. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि थोरले शाहू महाराज यांच्या काळात झालेला स्वराज्यविस्तार यावरही उहापोह करत शिवाजी महाराजांच्या काळातले जागतिक राजकारण आणि स्वराज्याची जगमान्यता ही भारतीय इतिहासातील नव्हे, तर जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी, प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौरभ पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुहास इनामदार यांनी, तर स्वागत करून अनिल थोरात यांनी आभार मानले. व्याख्यानास ग्रंथपाल महेंद्र लोखंडे, सेवानिवृत्त ग्रंथपाल संजय शिंदे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

मराठीला दरबारी भाषेचा दर्जा

नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, शिवकाळ व त्याआधीपासून फारशी ही दरबारी म्हणजेच आताची सरकारी भाषा होती. परंतु, शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोशाची निर्मिती करून मराठीला अधिकृत दरबारी भाषेच्या दर्जा दिला. शंभर पैकी जवळपास ४० मराठी शब्दांचा समावेश केला. त्यात थोरल्या शाहूंनी भर घालत शब्दसंख्या ५० पेक्षा जास्त केल्याचे केतन पुरी यांनी सांगितले.

बहिर्जी नाईक यांच्याबद्दल काल्पनिक घटना

शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याबद्दल आपण अनेक रंजक कथा ऐकल्या, वाचल्या आहेत. मात्र, सुरत आणि कोकण या दोन मोहिमांतील घटना सोडल्या, तर बहिर्जी नाईकांवर चार-सहा ओळींपेक्षा जास्त इतिहास लिहिल्याचे आढळत नाही. मात्र, त्यांच्यावर अनेक अफवा पसरवून इतिहासाची विकृती केल्याचे मत श्री. पुरी यांनी व्यक्त केले. 



©2026. All Rights Reserved.