सातारा न्यूज / बापू वाघ ( वाई )
वाई, एन.एस.एस. व एन.सी.सीचे विद्यार्थी सदैव तत्पर व दक्ष असतात. या विद्यार्थ्यांकडे कोणतेही व कसलेही काम दिल्यास ते बिनचूक करतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन पिक पाहणी करावी असे प्रतिपादन वाईच्या नायब तहसिलदार मा. ममता भंडारे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व तहसिल कार्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पिक पाहणी’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वाईचे मंडल अधिकारी प्रशांत इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. भंडारे म्हणाल्या, पिक पाहणी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या सारख्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरच्या शेतीच्या पिकांची व गावातील शिवाराची नोंद केल्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते. तुम्ही गावातील शासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांनी आपल्या भाषणातून शासनाच्या ॲपची माहिती दिली व ते कसे वापरावे ते सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले, महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला असल्याने प्रत्येकाच्या घरी शेती आहे. तुम्ही मनावर घेतल्यास हे काम सहज होऊ शकते. एन.एस.एस. चे स्वयंसेवक व एन.सी.सीचे छात्र यांनी हा प्रकल्प हातात घेऊन शासकीय कामात सहकार्य करावे.
प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. मनोज शिंदे, स्वाती देशमाने, निलम भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास एन.एस.एस. व एन.सी.सीचे स्वयंसेवक व छात्र बहुसंख्येने उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.