पाटण ; कोयनानगर जवळ हेळवाक, ता पाटण, जिल्हा सातारा येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. वनविभागाच्या पथकाने त्वरित घटनास्थळी पोहोचून सदर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. गुरुवार दिनांक सहा रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला.सुधीर कारंडे यांच्या घरातील सर्वजण दुर्गा देवी विसर्जनासाठी घर बाहेर गेले होते. त्यावेळी बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला. नेमके त्याचदरम्यान कारंडे घराकडे आले आणि त्यांनी बिबट्या घरात शिरल्याचे पाहून घराचे दार बंद केले.त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाची सर्व टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली. त्यांनी घरात घुसलेला बिबट्याला यशस्वीरीत्या पिंजऱ्यात पकडले.रात्री उशीरा पर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे , वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षक हे तत्परतेने घटनास्थळी पोहचले. त्यांनी बिबट्यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले आहे.
सदर बिबट्या हा लहान (वर्षभराचा) असून त्याच्या एका डोळ्यास बहुतेक मोतीबिंदू सारखे आहे. तर मागील उजव्या पायाने तो लंगडत आहे.
सदर बिबट्यास विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात येणार आहे.
सदर बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार व सर्व वन्यजीव विभागाचे स्टॅफ यांनी अथक प्रयत्न केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केले.
©2026. All Rights Reserved.