कोडोली : गोडोली नाका ते शिवराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज वाहनांची धडकाधडकी होत असून एकाद्याचा बळी गेल्यानंतर यंत्रणेला जाग येणार का? असा संतापजनक सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने तातडीने खड्डे मुजवावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.कोल्हापूरकडून सातारा शहरामध्ये प्रवेश करणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहने शिवराज चौक ते गोडोली नाका या राज्य मार्गांवरून ये-जा करत असतात. या मार्गावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दरम्यान, या मार्गावरील विलासपूरमधून जाणार्या मार्गावर चौका-चौकात मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी रोजच लहान- मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहन चालक व पादचारी यांचे मोठे हाल होत आहेत. विलासपूरमधील या रस्त्यालगत व्यावसायिकांची दुकाने, मेडिकल दुकाने तसेच अनेक डॉक्टरांचे दवाखाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्ते ओलांडताना अनेक वेळा लहान- मोठे अपघात होत आहेत. तसेच खड्डे चुकवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात येथील खड्डे मुजवावेत. एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. तातडीने दुरुस्ती न केल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा विलासपूरमधील नागरिकांनी दिला आहे.‘ऊंट की सवारी’चा अनुभव…गोडोली नाका ते शिवराज चौकापर्यंतच्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना व प्रवाशांना ‘ऊंट की सवारी’चा अनुभव येत आहे. खड्ड्यांमुळे मार्ग काढणे कठीण होत आहे. अनेकदा खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत असल्याने जायबंदी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
©2025. All Rights Reserved.