वृद्धत्वाचा फायदा घेऊन एका दाम्पत्याला कृष्णा-कोयना नागरी पतसंस्था आणि दि कराड अर्बन बँकेकडून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात
वृद्ध मुजावर दाम्पत्याची केली फसवणूक
ॲड. बाळासाहेब पानस्कर व अश्विनी नलवडे यांचा प्रताप; भूसंपादनात मिळालेले १५.५० कोटी लाटण्याचा प्रयत्न
कराड न्यायालयाने दिले तपासाचे आदेश
कराड -
वृद्धत्वाचा फायदा घेऊन एका दाम्पत्याला कृष्णा-कोयना नागरी पतसंस्था आणि दि. कराड अर्बन बँकेकडून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. शेलार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यास कृष्णा-कोयना पतसंस्था कराड, ॲड. बाळासाहेब पानस्कर, अश्विनी नलवडे व दि. कराड अर्बन बँकेवर विविध कलमाखाली पोलीस तपास करण्याचे आदेश पारित केले असल्याची माहिती कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जयवंतराव आवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, पाच वर्षांपूर्वी कराडमधील फिरोज मुजावर यांच्या परस्पर त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांची ॲड. बाळासाहेब पानस्कर, अश्विनी सतीश नलवडे (त्यांच्या महिला सहकारी) यांनी फसवणूक करीत कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराडचे ५ लाख रुपयांचे कर्ज काढून देतो, सांगून कर्जाच्या अर्जावर व कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या. तसेच फिरोज यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना ५ लाख रुपये दिले. फिरोज मुजावर यांच्या आई- वडिलांच्या वृद्धत्वाचा गैरफायदा घेऊन त्यातील ३ लाख रुपये केस दाखल करण्याचे कारण सांगून ॲड. बाळासाहेब पानस्कर यांनी घेतले. त्यानंतर त्याच अर्जावर कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड यांनी २० लाख रुपयांचे कर्ज रक्कम नमूद करण्यात आले. त्याबदल्यात त्यांची मलकापूरमधील करोडो रुपयांची शेतजमीन तारण करुन घेतली. तसेच त्यांच्या शेतजमिनीवर २० लाख रुपयांचा बोजा चढवला. परंतु, प्रत्यक्षात तेवढ्या रकमेचे कर्ज अदा केलेच नाही.
पाच वर्षानंतर कृष्णा-कोयना पतसंस्थेचे वसुली पथक शेतजमीन जप्तीसाठी फिरोज मुजावर यांच्या दारी धडकले. तेव्हा मुजावर यांना या घटनेची माहिती लागली. त्यानंतर त्यांनी संस्थेत जावून कर्जाचा अर्ज, नोंदणीकृत तारणखत दस्त वगैरे सर्व कागदपत्रे तपासली. यावेळी नोंदणीकृत तारणखत दस्तात जामीनदाराच्या जागेवर फिरोज मुजावर यांचे नाव टाकून त्यांची खोटी सही केल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्या वृद्ध आई वडिलांसह आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिरोज मुजावर यांनी कराडमधील कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. सदर ऑर्गनायझेशनने घटनेचे गांभीर्य पाहून या प्रकरणाचा सखोल तपास केला. यामध्ये फिरोज मुजावर यांच्या वडिलांच्या तारण केलेल्या शेतजमीनीचा काही भाग मलकापूर- ढेबेवाडी रस्त्यासाठी भूसंपादन झाला असून त्या भूसंपादनाच्या मोबदल्यात फिरोज मुजावर यांच्या कुटुंबाला शासनाकडून १५ कोटी ६४ लाख २० हजार रुपये मंजूर झाल्याचे ऑर्गनायझेशनला समजले. तसेच कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड यांनी ती शेतजमीन जप्त करुन जमीन व त्यावरील येणारा शासनाचा करोडो रुपयांचा मोबदला लाटण्यासाठी संगनमताने हा कट रचला गेल्याचे दिसून आले.
त्यानंतर कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनने फिरोज मुजावर यांच्यावतीने लढा उभारून सदर घटनेची कराड शहर पोलीसात तक्रार अर्ज दिला मात्र त्याची दखल पोलिसांनी दखल घेतली नाही त्यामुळे थेट कराड येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यावर कराड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. शेलार यांनी या फसवणुकीच्या गुन्ह्याबद्दल कराड शहर पोलीस ठाण्यास कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड, ॲड. बाळासाहेब पानस्कर, अश्विनी सतीश नलवडे (त्यांच्या महिला सहकारी) व दि. कराड अर्बन को-ऑप बँक मर्या. कराड यांनी केलेला गुन्हा दखलपात्र असल्याने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १२० ब, १६७, १९३, २१८, २२०, ४२०, ४६५, ४९९ सह ३४ अन्वये पोलीस चौकशी करणेचे आदेश पारित केले. याप्रकरणी फिर्यादी तर्फे ॲड. सुरेश निवृत्ती देसाई यांनी काम पाहत आहे.
दुय्यम निबंधक व उपनिबंधकांनाही करणार सहआरोपीनोंदणीकृत तारणखत नोंदविलेले सह दुय्यम निबंधक, फिरोज मुजावर यांच्या तक्रारीची दखल न घेता घडलेला गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणारे उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या शासकीय विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याचे कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनने प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे .
कोणत्याही वित्तीय संस्थेकडून फसवणूक झाल्यास संपर्क करा
कराडमधील कोणत्याही नागरीकांची कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड किंवा अन्य कोणत्याही वित्तीय संस्थेने फसवणूक केली असल्यास कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनशी संपर्क साधण्याचे जाहीर आवाहनही कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कृष्णा - कोयना पतसंस्था व दि. कराड अर्बन बँकेकडून मुजावर वृध्द दाम्पत्याची फसवणूक प्रकरणी पोलिसांना चार्चशिट न्यायालयात दाखल करावेच लागेल इतके सबळ पुरावे आहेत. पोलिसांनी तसे न केल्यास त्यानाही या प्रकरणी सहआरोपी करणार आहे. तसेच ज्येष्ठ वकिलाने पक्षकारांना चुकीचे मार्गदर्शन करून पक्षकाराकडून फी घेऊनही त्यांना न्याय मिळवून न देणे हा वकील पेशाला कलंक आहे.
ॲड. सुरेश देसाई, कराड
©2024. All Rights Reserved.