कराड शहर चावडी चंदेरीसोनेरी झगमगाटाच्या विळख्यातून अद्याप बाहेर पडलेली नाही तोच चावडीवर एकास हग्यामार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा इतिवृत्तांत...
कराड शहर चावडीवर एकास हग्यामार
मारणारे मोकळे...धरणारे गॅसवर
पराग शेणोलकर
कराड:
चोर आणि पोलीस यांचा खेळ पाठशिवणीचा. या पाठशिवणीच्या खेळातून म्हणा...नायतर कामातून. सिमेपल्याडहून एकास कराडातील काही वर्दीवाल्यांनी शहर चावडीवर पकडून आणले. चौकशीत त्याने चोऱ्यांची कबुली देत काही मोठा मुद्देमाल देखील सांगितला. त्याच्याकडे अजून जादाचा मुद्देमाल असल्याचा संशय कारभाऱ्यांना आला म्हणून त्यांनी साताऱ्यातील लय वरचा बी नाय आणि लय खालचा बी नाय.. अशा एका वर्दीवाल्या वरिष्ठ मैतराला आवातनं झाडलं. आणि सांगावा येतो ना येतो तोच दोन चार गड्यासणी घेऊन मैतर चावडीवर हजर. या वर्दीवाल्यानी कराडातील वर्दीवाल्यांच्या ताब्यात असणाऱ्याकडे चौकशी सुरू केली. कोणत्याही दप्तरी नोंद शिवाय.
ताब्यात असणाऱ्याची धू धू धुलाई झाली. ही धुलाई 'धस्स' प्रकरणाच्या जवळपास पोहोचणारी अशीच होती. अंगावर येणार ही भानगड. नोंदीविना झालेल्या धुलाईच्या दोन दिवसांनी का होईना पण घाईगडबडीत धराधरीच्या नोंदी घेत त्याला रखडत-खरडत न्याय दरबारी मु दिखाई झाली. न्याय दरबारी फारच चिकित्सक हुशार आणि अनुभवी. बारकावा टिकणाऱ्या न्यायदरबारायांच्या अखेर ही भानगड लक्षात आलीच. आणि पुढील घटनाक्रम समोर आला. तो असा...
कराडातील वर्दीवाल्यांनी संशयावरुन राज्याच्या सिमेपल्याडच्या भागातून एकास कराडात आणले. आणल्याची कोणतीही नोंद चावडीच्या दप्तरात न घेता सलग दोन दिस चौकशीचा सपाटाच सुरु झाला. ससा का..मासा असे करत...करत सरतेशेवटी सिमेपल्याडहून आणलेल्याने चोऱ्यांची कबुली दिली. मोठी उकल दिली. अजूनही उकल देणार या आनंदात कराडच्या चावडीप्रमुखाच्या मार्फतीने साताऱ्यातील लय वरिष्ठ बी नाय अन लय कनिष्ठ बी नाय, अशा पण प्रमुख शाखेच्या कारभाऱ्याला निरोप धडला. आ..एवढीच कबुली..जास्त असत्याल.. कशी देत नाय कबुली...थांबा मी आलोच, असा उलट निरोप देत साताऱ्यातील कारभारी कराडाच्या चावडीत दाखल झाला. सोबत तीनचारजण होतीच.
सिमेपल्याडहून पकडून आणलेल्याचा ताबा घेत नंतर सर्फ एक्सेल टाकून धुलाई सुरु झाली. हाण कि बडीव... हाण पुना...पुना..चा सिलसिला सुरु केला त्यांनी. पुरते अंग सोलाटल त्याच तरी गडी कटळत नव्हत...त्याला सोलटायच. तसा वर्दीवाल्याचा मार म्हणजे हाग्याच. दोनतीन दिवसांच्या रतीबाने सिमेपल्याडला गडी पाक हागाटला.
धस..धस..चा जप करत धस्स झालेल्यांनी नको ती बिलामत म्हणत नंतर कागदांची भेंडोळी रंगवण्यास सुरुवात केली. धरुन आणल्याच्या तीन दिवसानंतर पकडल्याची नोंद घेत सिमेपल्याडल्याला न्यायदरबारात नेण्याची लगीनघाई सुरु झाली. कागद रंगली, रंगवली गेली आणि वर्दीवाले धडकले न्याय मंदिरात. न्याय मंदिरातील कारभारी मात्र भागवत पुराणातील चाणक्यच.
चालताना लंगडणाऱ्याला सिमेपल्याडवाल्याला आधार देत न्याय दरबाराच्या प्रमुखापुढ उभ करण्यात आल. येताना आणि जाताना लंगडणाऱ्याचे निरीक्षण न्याय दरबाराच्या प्रमुखान केल आणि आदेश सोडला... थांबा.... न्यायदरबाराच्या प्रमुखाच्या आवाजान वर्दीवाल्यांच्या बुडाला घाम फुटला. तुम्ही व्हा बाहेर...ए..तु थांब आ...दार बंद करा...असा आदेश देत नंतर चौकशी सुरु झाली.
तोवर फोटुवाल्याला बोलावण धाडण्यात आल. सिमेपल्याडवाल्याची कापड उतरवली तर नुसत वळच..वळ अंगभर जखमा हे काय हाय... अस म्हणत आणखी चौकशी. नंतर कचाकच फोटु निघाल. हि भानगड तर बेकायदेशीर डांबून ठेवल्याची दिसतेय, असे म्हणत न्याय दरबाराच्या प्रमुखान दौत आणि टाक घेत कागद खरडायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत न्याय मंदिरात का त्या कूट सुरूच होता. ज्यांनी न्याय दरबारात आणलाय... त्यांच्याच ताब्यात सिमेपल्याडल्याला दिल्यास कायतरी आणखी घोळ होणार हे ओळखून त्याचा ताबा कराड शहर चावडी सोडून दुसऱ्या चावडीतील वर्दीवाल्यांकडे देण्यात आली. वैद्याकडे न्या...दवापाणी करा.. आणि अहवाल द्या... असा आदेश न्याय दरबाराच्या प्रमुखान दुसऱ्या चावडीवाल्यांना दिले. आदेशाबर अनेक तपासण्या झाल्या आणि नंतर त्याला एका दवाखान्यात निगरानीखाली ठेवल्याचे समजते.
हाडुक आत शिरतय.. हाडूक आत शिरतयअस लक्षात आल्याने कराडच्या चावडीतील वर्दीवाल्यांची पुरती तंतरली. आयला...कशाला आली होती ती झक माराय...मार दिला त्यांनी आणि आता हाडुक आमच्यात घुसतय.. असे म्हणत त्यांनी बुड तेल लावून चोळत धस..धस.. म्हणायला ...सुरुवात केल्याची चर्चा कराडात आहे.
(वाचा चंदेरीसोनेरी झगमगटाचा दुसरा भाग लवकरच.....)
©2024. All Rights Reserved.