वाई : किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने १५ ऑक्टोंबरला सुरू करणार असून किसन वीरच्या सभासद शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देणार, कामगारांचे पगार वेळेवर करणार, तुमच्या पै ना पै चा हिशोब देणार आणि ज्यांनी तुमच्या घामाचा पैसा बुडविला त्यांच्याकडून वसुल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. खंडाळा कारखान्यामध्ये सत्तांतर करीत किसन वीरच्या निवडणुकीतही शेतकरी सभासदांनी हुकुमशाहीला बाहेर काढुन किसन वीरमध्ये लोकशाही पुर्नप्रस्तापित केली असे उद्गार किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची ५१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी आमदार मकरंदआबा पाटील होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन काका पाटील, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष अनंत तांबे, बावधन सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आजची सभा ही निर्भिडपणे व आनंददायी एका मोकळ्या वातावरणात पार पडीत असल्याचा आनंद व्यक्त करीत आज बऱ्याच वर्षांनंतर लोकशाही दिसत आहे. कारखान्याचे संस्थापक स्व. किसन वीर यांनी तत्कालीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यक्षेत्रातील पाचही तालुक्यातील केंद्रबिंदु पाहून कारखान्याची उभारणी करून सक्षम नेतृत्व काय असते ते दाखविले होते. लोकशाहीमध्ये जय-पराजय होत असतो. १९ वर्षापूर्वी सभासदांनी सत्तातर करीत सुत्रे विरोधकांच्या हाती दिली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल या उद्दात्त हेतुन आम्ही बाय दिला. परंतु यांच्यामध्ये काहीही सुधारणा न होता त्यांनी कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढविला. बोजा एवढा वाढला कि कारखाना उभारणी वेळेस दुष्काळी परिस्थितीमुळे बंद होता परंतु मागील वर्षी ऊस असतानादेखील कारखाना बंद ठेवला. आणि गाळप सुरू केले २८ दिवस त्यातील १४ दिवस गाळप केले ते देखील मागील वर्षांचे शेतकऱ्यांचे पैसे न देता. त्यामुळे कारखान्याचा १८ कोटीचा तोटा वाढला. त्यामुळे कारखान्यावरील कर्जाचाही बोजामध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान, आर्थिक कुचंबना होणारा मनस्ताप विचारात घेता आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्याला तीन टर्म आमदार केले त्यांना यातुन बाहेर काढण्यासाठी आपण आपल्या कर्तव्यापासून पळ न काढता आपल्या आग्रहास्तव कारखान्याची निवडणुक लढविली व जिंकलीही. परंतु त्यानंतर आमच्यासमोर आली ती कारखान्याची भयानक अवस्था. ही अवस्था माहिती होती परंतु प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ही किती भयानक आहे हे प्रत्यक्षात पाहिले. कोणतीही बँक पैसे देत नाही त्यामुळे यावर एकच मार्ग दिसला तो म्हणजे निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे भाग भांडवल वाढविणे. आपणांस याबाबत आवाहन केले त्यास आपणाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आपण कारखाना सुरू करण्याच्या मार्गावर आहोत. सभासद शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण नोंद केलेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गळितासाठी द्यावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील म्हणाले की, किसन वीरची निवडणुक लढवायची कि नाही या द्विधा मनस्थितीत आम्ही होतो. लढविली तर कर्जाचा डोंगर एवढा मोठा आहे की, कोणतीही बँक कर्ज देणार नाही. परंतु शेतकरी व कामगारांना होणारा त्रास. आपण जर निवडणुक लढविली नाही तर कारखान्याचा कोणत्याही परिस्थितीत लिलाव होणारच. राजकारण करायचे ते कोणासाठी सर्वसामान्य जनतेसाठीच. त्यामुळेच ही निवडणुक लढविली व आपण सर्वांनी जवळपास १० ते ११ हजारांच्या मताधिक्याने निवडुणही दिले. आपणां सर्वांना भाग भांडवल वाढविण्याचे आवाहन केलेले होते. त्याला मिळालेला प्रतिसादामुळेच आपण जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अगोदर ऊस तोड वाहन मालकांना पहिला हप्त्याचे वाटप करू शकलो तसेच दुसरा हप्ताही दोन दिवसात त्यांच्या खात्यात वर्ग करणार आहोत. दोन्ही कारखान्यातील अंतर्गत कामेही अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही कारखान्याचे मिळून १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ असून त्याप्रमाणात यंत्रणाही भरण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही कारखाने १५ ऑक्टोंबरला सुरू करणार असून शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गळितासाठी घालावा, असे आवाहनही नितीनकाका पाटील यांनी
केले.
नोटीस वाचन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी सर्व विषय एकमताने मंजुर झाले. यावेळी किसन वीर व खंडाळा कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक
किसन वीरच्या सभासदांच्या ठेवीची मुदत वाढविण्याबाबत विषय येताच शेतकऱ्यांनी याप्रश्नी मागील व्यवस्थापनावर ताशेरे ओढीत आमदार मकरंदआबा पाटील यांच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवीत आपण बंद पडलेल्या कारखान्यास उर्जितावस्थेत आणीत आहात तर आम्हीही आमच्या ठेवींची मुदत ७ वर्षे न वाढविता त्या १० वर्षांकरिता वाढविण्यात याव्यात असेही सांगण्यात आले. यावेळी बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे यांनी ठेवीबद्दल दिलेला लढा यशस्वी झाला त्यामुळेच या ठेवी जीवंत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करा असे सांगितले.
©2026. All Rights Reserved.