कराड तालुक्यातील पोलीस प्रशासन नेहमीच राज्य आणि जिल्हा पातळीवर आपल्या विविध कारणाम्यांसाठी चर्चेत राहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कराड शहर पोलीस चावडीवर चंदेरी सोनेरी झगमगाटाचा घेतलेला इतिवृत्तांत
चंदेरीसोनेरी झगमगाट...
कराड शहर पोलिस चावडीवर चर्चांचा घमघमाट...
पराग शेणोलकर
कराड:
"घेताना दहा घ्यायचे आणि मोजताना एक मोजायच", अशी पोलिस दलातील अनेकांची कार्यपध्दती असते. अशाच कार्यपध्दतीमुळे कराड शहर परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून चंदेरीसोनेरी झगमगाटाची चर्चा आहे. या चर्चेचा कानोसा घेतला असता, त्यात काहीअंशी तथ्य असल्याचे समोर येत असून यात वरपासून खालपर्यंत अनेकांनी स्वत:ची चांदी करुन घेतल्याचे समजते. या चंदेरीसोनेरी झगमगाटाच्या चर्चेचा कानोसा...जशाचा..तसा.....
करवीननिवासिनीच्या भूमितून एक कुजबुज निरोप कराडातील वर्दीवाल्याच्या कानावर आली. खुसफुस..खुसफुस.. अस करत सांगणाऱ्याने माहिती ऐकणाऱ्याच्या कानात सांगितली. यानंतर त्याने ही माहिती हम लिफाफेसे हि 'भाप' कर लेते हे खतका मजलुम, या दर्जाच्या जरा वरच्या वर्दीवाल्याला दिली. चंदेरीसोनेरी झगमगाटाचा खजिना आलिशान बसमधून अमक्तातमक्या तारखेला, इतक्यातितक्या वाजता करविरनिवासिनीच्या भूमीतुन मुंबादेवीच्या भूमीकडे रवाना होणार असल्याने चार छोटेमोठे वर्दीवाले लागले कामाला. झाकपुक...झाकपुक करत मुंबादेवीच्या भूमीकडे निघालेली बस कराडच्या हद्दीतील एका ढे-बे वाडीफाट्यावर गेल्या महिन्याच्या अखेरीच्या आठवड्यातील एका रातीला आली. कानात कुजबुजणाऱ्याने दिलेल्या माहितीची बस पाहून तीला थांबण्याची इशारत वर्दीवाल्यांनी आपल्या स्टाईलने केली. झाली बस थांबली.
ए खाली ये...असे म्हणत चालकाला व सोबत्याला खाली घेण्यात आले. नंतर बसची तपासणी झाली. तपासणीत माहिती मिळाल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची २-४ खोकी होती. याच खोक्यात चंदेरीसोनेरी झगमगाट असल्याने नंतर बसमधील प्रवाशांना त्याचठिकाणी सोडून बस थेट मोठ्या वर्दीवाल्याच्या समोर आणण्यात आली. वैयक्तीक, सामुहिक चर्चेच्या फैरी झडल्या आणि पांढऱ्या रंगाची खोकी बसमधून उतरवून घेत ती डी आणि बी कक्षात ठेवण्यात आली. त्याची नोंद चावडीच्या दप्तरात करण्यात आली. कक्षात ठेवलेल्यापैकी एक पांढरे खोके तपासणीसाठी फोडण्यात आले, तर आतून चंदेरी झगमगाट बाहेर उसळला.
अरे... थांबा. कोणतरी म्हणाले. कोणाची खोकी आहेत, कोणासोबत होती, त्याला आणा, असे फर्मान निघाले. त्यानुसार खोक्यांच्या राखणीला असणाऱ्याला आणण्यात आले. काय आहे, असे दरडावत विचारल्यानंतर त्याने जे आहे...जसे आहे, तशी माहिती दिली. यानंतर बंदोबस्तात चंदेरीसोनेरी झगमगाटाची मोजणी झाली. चिपट, मापट, आदुलीपायली, आडशिरीवर न जाता थेट काटाच आणण्यात आला. झगमगाट मोजण्यात आला आणि पावत्यांची तपासणी झाली. पावत्यांवरील नोंदीपेक्षा चंदेरीसोनेरी झगमगाटाच ओझं जास्त असल्याने उपस्थितांनी शर्टाच्या बाह्या मागे खेचल्या.
ते दुसऱ्या खात्यातील वर्दीवाले कोण?
कोणतरी अनुभवाने म्हणाला...थांबा. गरम खावू नका. कानोसा घ्या. भिंतींचे कान लिपून टाका. अनुभवाने बोलणाऱ्याचे ऐकून भिंतींचे नाक, कान, डोळे लिपण्यात आले. दुसऱ्या खात्याच्या वर्दीवाल्यांच्याही चकरा झाल्या. पावत्या आणि मुळ झगमगाटाचा मेळ बसत नसल्याने सरतेशेवटी घासाघीसीची बैठक वरिष्ठ वर्दीवाल्यांसमवेत झाल्याची चर्चा आहे. चर्चेअंती सुवर्णमध्य निघाला. तीन दिवसांनी ती बस आणि पांढऱ्या रंगाची खोकी त्याठिकाणाहून परत गेली. अर्थात याचीही नोंद चावडीच्या दप्तरात करण्यात आलीच.
पांढऱ्या खोक्यात चंदेरीसोनेरी झगमगाट नव्हता तर ती तीन दिवस का अडकवून ठेवली? पांढऱ्या खोक्यांत नेमके काय होते? याचा तपशील आणि त्याबाबतची चर्चा पोलीस चावडीसह कराडात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ही चर्चा जशीच्या तशी... मांडण्यात येत आहे.
यात अनेकजण आता 'मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी' असे म्हणण्याच्या तयारीत असल्याचेही समजत आहे. (वाचकांनी जास्तीचा तपशील आणि माहिती पुरविल्यास त्याची मांडणीही स्वतंत्रपणे करण्यात येईल)
©2024. All Rights Reserved.