पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हौदास घातला असून दररोज चार ते पाच जणांचे लचके ही मोकाट कुत्री तोडत आहेत.मोकाट कुत्र्यांमुळे पाचणीकर हैराण झाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल सोयरसुतक नसल्याचे दुर्दैवी चित्र पाचगणीत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्याने चार दिवसांपूर्वी भिमनगर येथील सहा वर्षीय बालिकेच्या डोळ्याचा लचका तोडला.
परवा रात्री राधाकृष्ण मंदिर परिसरात नऊच्या सुमारास दरवाज्यात उभ्या असलेल्या सहा वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. अशा घटना वारंवार घडत आहेत.
पाचगणी ग्रामिण रूग्णालयात दररोज चार ते पाच रूग्ण कुत्र्याने चावा घेतला म्हणून उपचारासाठी दाखल होत आहेत.केवळ सरकारी रुग्णालयातील ही आकडेवारी असून, खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. यातील बहुतांश रूग्ण हे शहरातील असून, ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या कमीच आहे.विशेषत: मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे.
मोकाट कुत्री लहान मुलांचे लचके तोडत आहेत. कुत्र्यांचे हल्ले वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या प्राणीमित्र संघटनेविषयी नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेले नगर पालिका प्रशासन याकडे नेहमीच कानाडोळा करीत आले आहे.
©2024. All Rights Reserved.