आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्ले हाऊस सुरू होण्याच्या वेळेत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने आंदोलन स्थळास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप
कराडच्या कोयना कॉलनीतील वातावरण तंग
आंदोलक आक्रमक; प्ले हाऊस सुरूच
कराड: कोयना कॉलनीतील मूळ निवासी व सदस्यांनी येथील बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करून स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्ले हाऊस सुरू होण्याच्या वेळेत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने आंदोलन स्थळास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान, प्ले हाऊसकडे येणारी वाट अडवल्याचे कारण सांगत प्ले हाऊस चालक ठक्कर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. तर आंदोलनकर्त्यांनी थेट पोलीस विभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या आंदोलनाचे निवेदन देऊन आपली कैफियत मांडली.
कोयना गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधी सोसायटी सदस्यांवर बंधनकारक आहे. या उपविधीतील तरतुदीनुसार येथील सदनिका रहिवासी वापरासाठी असल्याचे निबंधक कार्यालयाने पत्राद्वारे सोसायटीचे संस्थेचे चेअरमन, सचिव व तक्रारदार यांना कळविले आहे. तर यापूर्वीच संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संबंधित प्रियांका प्ले हाऊस स्थलांतरित करण्याविषयीचा ठराव करण्यात आला आहे. असे असतानाही प्ले हाऊस कॉलनीतून अन्यत्र स्थलांतरित करण्याऐवजी आहे त्याच ठिकाणी पुन्हा सुरू केल्याने येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी आंदोलनात सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी प्ले हाऊस सुरू होण्याच्या वेळी पालक व विद्यार्थी यांनाही निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या. काही पालकांनी आपले विद्यार्थी प्रियांका प्ले हाऊसमध्ये पाठवले. तर काहींनी परत घेऊन गेले.
याच दरम्यान, प्ले हाऊसकडे येणारा मार्ग आंदोलनकर्त्यांनी अडवल्याची तक्रार घेऊन चालक ठक्कर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस प्रशासनाने यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आंदोलन करताना पोलीस स्टेशनला बोलावणे केले. आपणाला रस्ता अडवता येणार नसल्याचे आंदोलन कर्त्याना बजावले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन व शासनाचा सर्व पत्र व्यवहार सादर केला.आपली कैफियत मांडली.
आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर
आंदोलन स्थळ व आंदोलनकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या जोडीला एक छायाचित्रकार व व्हिडिओ शूटिंग करणारा खासगी इसम नेमण्यात आल्याचे दिसून आले. संबंधित छायाचित्रकारास आपण कोणत्या विभागाकडून आहात, याची विचारणा केली असता त्यांनी पोलीस प्रशासनाने मला रस्त्यावर उभे राहून या आंदोलनाचे संपूर्ण शूटिंग करण्याचे सूचना केल्याचे सांगितले.
प्ले हाऊसच्या तक्रारीची तात्काळ दखल...
आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवल्याचे तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलेल्या प्ले हाऊस चालक ठक्कर यांची शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. आम्हा आंदोलकांना बोलवून आमची झाडाझुडती घेण्यात आली. परंतु दि.16 मे 2023 रोजी आम्ही विशेष सभेदरम्यान झालेली वादावादी, दमदाटी, शिवीगाळीची लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, मात्र बेकायदेशीर कृत्य करणारांच्या तक्रारीला पोलिसांकडून प्राधान्य दिले जाते, अशी खंत आंदोलनकर्ते महिला व पुरुषांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पालकांना आवाहन....
प्रियांका प्ले हाऊसमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी व पालकांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही. उलट या प्ले हाऊसमुळे आम्हा स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाचाही पालकांनी विचार करून येथील प्ले हाऊस स्थलांतरित झाल्यानंतर आपले पाल्य प्ले हाऊसला पाठवावे, असे कोयना कॉलनीचे सदस्य व आंदोलनकर्ते म्हणून आवाहन करत आहोत.
©2024. All Rights Reserved.