सातारा नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादमांच्या बोगस सह्या करत एका पुणेरी ठेकेदाराने कचरा उचलण्याच्या कामाचे बिल पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत काढले आहे. काढलेल्या बिलातील प्रसाद मिळत असल्याने मुकादमांच्या सह्या खऱ्या की खोट्या याची कोणतीही शहानिशा करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल
पुणेरी ठेकेदाराची अधिकाऱ्यांशी हातमिळवणी
सह्या खऱ्या की खोट्या?
पराग शेणोलकर
सातारा नगर पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादमांच्या बोगस सह्या करत एका पुणेरी ठेकेदाराने कचरा उचलण्याच्या कामाचे बिल पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत काढले आहे. काढलेल्या बिलातील प्रसाद मिळत असल्याने मुकादमांच्या सह्या खऱ्या की खोट्या याची कोणतीही शहानिशा करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
एकंदरच या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाला खिंडीत गाठत ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्यासाठी कायदेशीर जुळवाजुळव करत आहेत.
सातारा पालिका प्रशासनाचा कारभार, ठेकेदारी साटेलोटयामुळे पालिकेच्या तिजोरीची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. आरोग्यमधील दोन, बांधकामचा एक, गारगार केबिनमध्ये बसणारा मुख्य आणि ठेकेदार असे समीकरण गेली अठरा महिने पालिकेत रुळले आहे.
याकाळात जगातील सगळी आश्चर्ये भंगारात निघतील इतकी सरळसोट (बेकायदेशीर) कामे संगनमताने झाली आहेत. या कामात कधी खासदार, कधी आमदार यांच्या नावाचा आधार देखील घेतला जातो. हे काम त्यांचं, हे ह्यांच, त्यांनी फोन केला होता असे सांगत मनगटी जोर वापरला जात आहे.
शहरातील खुल्या जागी पडणारा कचरा गोळा करत तो कचरा डेपोत नेण्याचे काम पुणेरी ठेकेदार करत आहे. तो मूळचा शहराजवळील नदीकाठच्या गावातील असल्याचे सांगत भेटेल त्याच्याशी पदर जुळवून घेत असतो. या ठेकेदाराने शहरात कार्यरत असणाऱ्या पंचवीस पैकी फक्त दोन ते तीन मुकादमांच्या प्रत्यक्ष सह्या घेत उर्वरीत मुकादमांच्या खोट्या सह्या करत बिलाचा आंबा नुकताच पाडला आहे. यावेळी त्याने एका महिला अधिकाऱ्याला अंधारात ठेवत बिलातील काही रक्कम थेट थोरल्या बुडक्याकडे जाणार असल्याची बतावणी केल्याची माहिती मिळत आहे. थोरल्या बुडक्याचे नाव पुढे आल्याने त्या महिला अधिकाऱ्याने नको ती बिलामत म्हणत पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
एकंदर असे प्रकार यापूर्वी अनेकवेळा घडले असल्याची चर्चा असून काम न करता मुकादमांच्या खोट्या सह्या करत अनेक बिले निघाली आहेत. गेली अनेक दिवस याची चर्चा पालिकेत सुरू आहे. ही चर्चा कानावर पडल्याने काहीजण सक्रीय झाले असून त्यांनी फौजदारीच्या माध्यमातून पालिका प्रशासन आणि ठेकेदार, त्याचे पाठीराखे गोत्यात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दोन महिने उरलेला कालावधी संपवून ठेकेदार पुण्याकडे माघारी फिरणार असून त्याची अनामत रकक्म, त्याचे बिल रोखण्याची मागणी करणारे पत्र येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांच्या टेबलावर जाऊन पडणार आहे.
( इतर भानगडी लवकरच सविस्तर.)
©2024. All Rights Reserved.