शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीपदादा पवार यांना जीवे मारण्याची जाहीर सभेत धमकी!
सातारा : जावली बाजार समिती निवडणूक तापली असून तेथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले- आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार- माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्यागटात थेट लढत होत आहे. याच लढतीच्या प्रचारावेळी जावलीतील जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी वरील प्रकारे धमकी दिल्याची अदखलपात्र तक्रार सनपाने येथील संदीप सर्जेराव पवार यांनी गुरुवारी कुडाळ पोलीस दुरक्षेत्रात नोंदवली आहे.
यात म्हंटले आहे की, जावली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारादरम्यान दि.२६ रोजी कुडाळ येथे शेतकरी विकास पॅनेलच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत वसंतराव मानकुमरे यांनी मला (संदीप पवार, उपजिल्हाप्रमुख शिवसेना-एकनाथ शिंदे गट) उद्देशून शिवीगाळ केली.
ते म्हणाले, तो भाडखाऊ- संदीप पवार. त्याला मस्ती आली आहे, त्याला सटकून मारले पाहिजे. त्याला कायमचे बघून घेतले पाहिजे, अशी भाषा वापरली. असे कुडाळ पोलीस दुरक्षेत्रात नोंदवलेल्या अदखलपात्र तक्रारीत म्हटले आहे. याच आशयाचा तक्रार अर्जही संदीप पवार यांनी मेढा पोलीस ठाण्यात देखील दिला होता.
एकंदरच जावली बाजार समिती निवडणुकीचे वातावरण मुद्दयावरून पुन्हा एकदा गुद्द्यावर आले आहे. महाविकास आघाडीत देखील बेबनाव झाला असून त्याची तक्रार दीपक पवार यांनी दस्तुरखुद्द खासदार शरद पवार यांच्याकडे देखील केली होती. ही निवडणूक २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी असून त्यात कोण बाजी मारणार हे काही दिवसांनी समोर येणार आहे.
©2024. All Rights Reserved.