कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये अविनाशदादा मोहिते गटाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. दादांची भूमिका आणि दादासेनेची संभ्रमावस्था याचा घेतलेला आढावा....
कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ
अविनाशसेना दाखवणार इंगा?
दादा आमदार बाबांसोबत; समर्थक तिसऱ्या पर्यायाच्या शोधात
पराग शेणोलकर
कराड -
पश्चिम महाराष्ट्रासह विशेषकरून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावणारा साखर कारखाना म्हणून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. या कारखान्याचा नावलौकिक एवढा की, या कारखान्याचा एखादा संचालक मिनी आमदार म्हणूनच ओळखला जातो. अशा या आर्थिकदृष्ट्या कुबेर आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कृष्णा कारखान्याच्या महत्वपूर्ण निवडणुकीत पुरोगामी विचार आणि काँग्रेस विचारधारेच्या बाता हाणणाऱ्या आमदार बाबांनी ऐनवेळी पाठ दाखवत निवडणुकीतून पळ काढला. कारखान्याचे माजी चेअरमन राहिलेल्या अविनाशदादांची ऐनवेळेला साथ सोडून रणांगण सोडले. आता अडचणीत असणाऱ्या याच आमदार बाबांचे हात आता दगडाखाली आहेत. त्यामुळे आपल्या दादाच्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी दादासेनेकडे आहे. या लढतीत दादा आमदार बाबा सोबत असलेतरी दादासेना मात्र तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे.
त्याचे घडले असे की, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध कारखान्याचे माजी चेअरमन राहिलेल्या आणखी एका विचारवंत बाबाने परंपरा जोपासण्यासाठी पॅनल टाकले. खरेतर याबाबतचे बहुमूल्य विचार ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ कार्यकर्तेच उरलेले नाहीत. याची जाणीव असताना, आपण कधीही निवडून येऊ शकत नाही, ही खात्री असताना त्यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधला. परंतु, कारखान्याच्या गत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धूळ चारणाऱ्या अविनाशदादांनी कारखान्याच्या इतिहासात मोठे परिवर्तन करत कृष्णा कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. त्यामुळे या निवडणुकीत एकास एक लढत व्हावी, अशी सभासदांची इच्छा होती. त्यासाठी विचारवंत बाबा व दादांनी एकच पॅनल टाकून एकत्र निवडणूक लढवावी, अशी सभासदांची इच्छा होती. मात्र, या निवडणुकीत विचारवंत बाबा मलाच कारखान्याचे चेअरमन व्हायचे आहे, असा बालहट्ट धरून बसले. तो हट्ट काही सोडायला तयार नव्हते. त्यामुळे याचा फायदा भोसले गटाला होणार हे स्पष्टच.
दरम्यान, अविनाशदादांनी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये, यासाठी आमदार बाबांकडे मध्यस्थीची आर्जव केली. या बाबांनी दोन्ही गटात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला खरा मात्र हा प्रयत्न होता की केवळ तसा दिखावा? हे आमदार बाबांनाच माहित. मात्र, निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत पाठ दाखवत त्यानी अविनाशदादांची साथ सोडली. यामध्ये स्वतःला विचारवंत समजणाऱ्या बाबाचा अप्रत्यक्षपणे फायदा व्हावा, अशी खेळीतर या दोन्ही बाबांनी मिळून केली नसेल कशावरून अशी शंका व कुजबुज दादा समर्थकांमध्ये आहे.
मदत करावी तर का करावी...
सध्या विधानसभेची रणधुमाळी ऐन भरात आली आहे. दादांचे कट्टर विरोधक असलेले डॉ. अतुलबाबा विरुद्ध आ.पृथ्वीराज बाबा अशी समोरासमोरची लढाई होत आहे. तसं पाहायला गेलं तर दादांचे डॉ. भोसले यांच्याशी सरळ शत्रुत्व. आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी कायम ठाम असलेल्या अविनाश मोहिते यांना कारखाना निवडणुकीत एकट सोडलं. त्यामुळे थेट शत्रू असलेल्या भोसलेंना मदत करावी तर ते शक्य नाही आणि आमदार बाबांना मदत करावी तर का करावी? असा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
अविनाशदादांचा फक्त वापरच....
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज लढतीत मनाचा मोठेपणा दाखवत अविनाशदादांनी आमदार बाबांना समर्थन देण्यासाठी मोठ्या मनाने निर्णय घेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. निवडणुकीत आमदार बाबांना हात देण्याचे समर्थक, कार्यकर्त्यांना आवाहनही केले. मात्र, आपला मोठ्या मनाचा भोळा दादा सर्व मान-अपमान, बाबांनी केलेल्या दगा फटका विसरून त्याची साथ द्यायला तयार झाले खरे. मात्र, हे दादासेनेला हे काय रुचलेलं नाही. काँग्रेस असो व राष्ट्रवादी दोघांनीही अविनाश दादांचा नेहमीच फायदा घेतला. आणि ज्यावेळी दादा अडचणीत होते त्यावेळी मात्र त्यांना सोडून दिलं, हे वास्तव नाकारता येणार नाही. आणि हे न कळण्या इतका दादा समर्थक मूर्ख नाही. आपल्या दादाच्या अपमानाची सल अजूनही मनात धरून असलेल्या समर्थक, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आता दगडाखाली हात असलेल्या आमदार बाबांना हात दाखवायचा; की त्याना हात द्यायचा, यावर विचार करत आहे.
दादासेनेच्या डोक्यात तिसरा पर्याय.. ?
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीपासून डॉ. भोसले थेट शत्रू तर आमदार बाबा हे दगा फटका करणारे बाबा अशी भावना अविनाशदादा प्रेमी सभासदांमध्ये आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत दोनही उमेदवार हे दादाविरोधीच. त्यामुळे आम्ही दादाप्रेमी वेळप्रसंगी तिसरा पर्याय म्हणून नकाराधिकाराचा स्वीकारणार असल्याचे खासगीत सांगत आहेत.
©2024. All Rights Reserved.