कृष्णा-कोयनेच्या पाण्याने समृध्द झालेल्या कराडच्या काठावर गेल्या काही वर्षांत लालमाती आणि काळ्यासोन्याला प्रचंड महत्त्व आले आहे. या दोन गोष्टींसाठी काठ ओरबडण्याबरोबरच कृष्णा आणि कोयनेचे पोट फाडण्याचे काम राजरोस राजकीय आश्रयाने सुरु आहे. यावर भाष्य करणारी 'राजकीय रखवालदारांची पोलखोल' करणारी ही वृत्तमालिका.
कैसा चलेगा.....
बाबा-साहेब
मातीत...पाती.. अन् वाळूत लोळू
पराग शेणोलकर
कराड :
कृष्णा-कोयनेच्या पाण्याने समृध्द झालेल्या कराडच्या काठावर गेल्या काही वर्षांत लालमाती आणि काळ्यासोन्याला प्रचंड महत्त्व आले आहे. या दोन गोष्टींसाठी काठ ओरबडण्याबरोबरच कृष्णा आणि कोयनेचे पोट फाडण्याचे काम राजरोस राजकीय आश्रयाने सुरु आहे. कराड तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असणाऱ्या या कामांवर कारवाईदरम्यान महसुली अधिकाऱ्यांवर बाबा, साहेब आणि त्यांच्या जवळकरांकडून दबाव टाकण्या येतो. या दबावाला महसुली अधिकारी वैतागले असून तेच मातीत...पाती अन् वाळूत लोळू असे म्हणत एैसा कैसा चलेगा...बाबा - साहेब अशी प्रतिक्रिया खासगीत नोंदवत आहेत.
कृष्णा-कोयनेच्या पाण्याने कराड काठ समृध्द केला आहे. कसदार पाणी, कसदार माती आणि कसदार धान्यामुळे येथील मनगटात रग आणि उरात धग भरली आहे. ज्या पाण्याने कराडकरांचे जीवन समृध्द केले तेच कराडकर आत्ता नदीचे काठ मातीसाठी आणि पोट काळ्यासोन्यासाठी (वाळू) फाडत आहेत. गेल्या काहीवर्षांपूर्वी या लुटालुटीचा आटके पॅटर्न तयार झाला होता. हा आटके पॅटर्नचा नंतर अनेक छोट्यामोठ्या हातपाटी आणि बोटवाल्यांनी आधार घेतला. जशी जमेल तशी उपशाउपशी करत गल्ला गोळा करणारे शेठजी आणि गाड्यांचा हिशोब ठेवणारे दिवाणजी नंतरच्या काळात गावोगावात जन्मले. या शेठ आणि दिवाणजींचा उतमात कराड तालुक्यातील अनेक गावातील सर्वसामान्यांनी बघीतला आहे.
नाव मातीचे आणि उपसा वाळूचा असे धोरण राबवत गेल्या काही महिन्यांत कृष्णा, कोयना काठ पुन्हा एकदा ओरबडण्यास सुरुवात झाली. माती उपशाचा तात्पुरता काढलेला परवाना सवडीने महिनोंमहिने चालवत हे शेठ, दिवाणजी आपल्याच बापाची नदी असल्याच्या तोऱ्यात फिरत असतात.
खुदाई मशीन गायब...
गेल्या काही दिवसांपूर्वी कराड शहराजवळ अशाच पध्दतीने महसुली विभागाने वाळू चोरांवर कारवाई करत काही वाहने ताब्यात घेतली. कारवाईनंतर त्याठिकाणी आलेल्या लाख्याशेठने उत्तरेतल्या साहेबांना फोन लावला. फोन महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर नाचवत बोला...साहेबांशी बोला, असे म्हणत दबाव आणला. याचदरम्यान उत्तरेतील साहेबांनी कार्यकर्ता माझा आहे...सोडा, असा आदेश दिला. आदेशाबरोबर त्याठिकाणी असणारे खुदाई मशीन कागदावर येण्याअगोदर गायब झाले.
फोन खणाणले...
केलेली कारवाई दाखवाय तर पाहिजे म्हणून महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कागद रंगवायला सुरुवात केली. कागद रंगवायचे काम सुरु असतानाच दक्षिणेतील गोऱ्यागोमट्या बाबाचा फोन आला. हा फोन बंद होतोय न होतोय तोच बट नॅचरल, अशा शब्दात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खिल्ली उडवलेल्या बाबांच्या जवळकरांचा फोन मातीच्या नावाखाली वाळू चोरणाऱ्यांच्या मदतीसाठी खणाणला. हा फोन बंद झाल्यानंतर काही वेळातच कोरेगावकर मठाधिपतींचा फोन आला.
अन् पुन्हा ट्रॅक्टर ओढून आणले
फोनवर फोन घेवून वैतागलेल्या महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नंतर एक ट्रॅक्टर जप्त दाखवत कारवाई उरकली. याची भनक लागल्यानंतर बोंबाबोंब झाली. बातम्या झळकल्या आणि नंतर पुन्हा दारात उभे असणारे ट्रॅक्टर ओढून आणण्यात आले. गेले काही दिवसांपासून कारवाईचा हा खेळ सुरु आहे.
अधिकाऱ्यांची पाय बांधून पळण्याची शर्यत...
जिल्हास्तरावरील बैठकीत गळा सुकेपर्यंत कायदा सुव्यवस्थेची जपमाळ ओढणारेच लोकप्रतिनिधी वाळू, माती चोरांच्या मदतीसाठी सरसावत असल्याने महसुली अधिकारी, कर्मचारी हतबल झाले आहेत. अवैध धंदे, ते करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा,असे आदेश सभेत सोडणारे लोकप्रतिनिधी महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाय बांधून त्यांना पळण्याच्या शर्यतीत उतरवत आहेत. सांगा कस...व्हायच आणि कस चालायच… मातीत पाती अन् वाळूत लोळू हे धोरण कस मोडायच. (क्रमशः)
भाग -१
©2025. All Rights Reserved.