येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील विविध पीक पद्धती पाहता आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा
सातारा :
येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील विविध पीक पद्धती पाहता आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 97 हजार 348 हेक्टर असून त्याकरिता 47 हजार 339 क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. तर 1 लाख 36 हजार 500 मे. टन रासायनिक खतांची मागणी कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालय पुणे यांचेकडून जिल्ह्यासाठी 1 लाख 15 हजार 101 मेट्रिक टन रासायनिक खत आणि 54 हजार 770 नॅनो युरिया बॉटलचे आवंटन खरीप हंगामासाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया 42 हजार 521 मे. टन, डीएपी 12 हजार 131 मे.टन, एमओपी 6 हजार 761 मे.टन, सुपर फॉस्फेट 11 हजार 939 मे.टन तर इतर संयुक्त खते 39 हजार 19 मे.टन खतांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 63 हजार 561 मे.टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील 55 हजार 862 मे.टन खत शिल्लक आहे. तर एक एप्रिल 2023 पासून 7 हजार 699 मे.टन खत पुरवठा करण्यात आलेला आहे. उपलब्ध खतामध्ये युरिया 18 हजार 943 मे.टन, डीएपी 9 हजार 119 मे.टन, एमओपी 834 मे.टन, सुपर फॉस्फेट 9 हजार 798 मे.टन, इतर संयुक्त खते 24 हजार 867 मे. टनचा समावेश आहे. कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खतांची माहिती पाहण्यासाठी कृषी विभागाने कृषिक ॲप च्या माध्यमातून सेवा उपलब्ध केलेली आहे. हे कृषिक ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकरी बांधवांनी हे ॲप डाऊनलोड करून खत उपलब्धतेच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले आहे.
रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच खतांच्या सुयोग्य समतोल वितरणासाठी जिल्ह्यात 12 भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.
कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते बियाणे व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले द्यावीत. तसेच शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा विषयी शंका असल्यास संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
- भाग्यश्री फरांदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
©2024. All Rights Reserved.