अमली पदार्थ मुक्त व हेल्दी कराड' हा उद्देश ठेवून जनजागृती करण्यासाठी रविवारी "रन फॉर पोलीस २०२५" ही मॅरेथॉन होत आहे. कराड पोलिसांनी जनजागृतीचा घेतलेला वसा, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीचा ओघ, स्पॉन्सरशिपचा बोलबाला आणि कराडकरांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावर सविस्तर भाष्य....
स्पॉन्सरशिप, वर्गण्या व सक्ती
रन फॉर पोलीस मॅरेथॉनला कार्पोरेट लूक
पराग शेणोलकर
कराड :
'अमली पदार्थ मुक्त व हेल्दी कराड' हा उद्देश ठेवून जनजागृती करण्यासाठी रविवार (दि. १९) रोजी "रन फॉर पोलीस २०२५" ही मॅरेथॉन होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे आयोजन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या पोलिसांनी केले आहे. तर त्यांच्या मदतीला कराड मधील अनेक सामाजिक सेवाभावी संस्था, संघटना, पदाधिकारी, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. एवढ्या मोठ्या आणि कार्पोरेट दर्जाच्या मॅरेथॉनचे आयोजन कराड पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याचे पहावयास मिळाले. याची नोंद कराडच्या इतिहासात नक्कीच होईल. परंतु, कराड पोलिसांनी जनजागृतीचा हाती घेतलेला वसा ही बाजू जितकी महत्वाची आहे, तेवढीच आपल्या कार्य कर्तृत्वाचा विसर पडल्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. पोलिसांनी जनजागृतीचे काम नक्कीच करावे तितकेच पोलिसिंगही प्रामाणिकपणे पार पाडले तर असे स्पॉन्सरशिप घेऊन वर्गण्या गोळा करून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सक्ती करून इव्हेंट करण्याची गरज भासणार नाही, असा एक मतप्रवाह आहे.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य फक्त बोलण्यापुरतेच आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबध्द आहेत. याच्या जोडीला कराड पोलिसांनी समाज प्रबोधनाचा सुरू केलेला हा नवीन अध्याय म्हणजे आपल्या कार्य कर्तृत्वावर स्वतःच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा कराड पोलीस संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.
याचा घेतलेला कानोसा जसाचा तसा ....
कराड पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ मुक्त हेल्दी कराड हा उद्देश ठेवून जनजागृती करण्यासाठी 'रन फॉर पोलीस २०२५' ही मॅरेथॉन आज पहाटे होत आहे. या मॅरेथॉनमध्ये ३ ते ४ हजार पेक्षाही जास्त नागरिक सहभागी होतील, असा अंदाज आहे. कराड तालुक्याचे शारिरिक आरोग्य जपण्यासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन हा स्तुत्य उपक्रम असलातरी सामाजिक, सार्वजनिक स्वास्थ कायम राखण्यासाठी अशाच पध्दतीने मॅरेथॉन आराखडा तयार करण्याची गरज व जबाबदारी कराड पोलिसांची आहे. मुळात समाज आणि पोलीस हातात हात घालून जाणाऱ्या दोन समांतर व्यवस्था आहेत. चांगल्या गोष्टीला समाज नेहमीच पोलीस दलास भरभरुन साथ देतो तर अनिष्ठ प्रकारांवेळी तितक्याच प्रखरतेने विरोध देखील नोंदवतो. कराड पोलीस असे समाजभान असणारे उपक्रमशील आहेत. या उपक्रमांना नेहमीच सर्वच स्तरातून पाठींबा मिळत गेला आहे.
कराड हे सर्वच पातळीवर संवेदनशील आहे. राजकीय, सामाजिक, समाजकारण, शैक्षणिक आदी पातळीवर कराडचा नावलौकिक देशात आहे. या कराडकरांच्या आरोग्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यासाठी सर्वच स्तराने सढळ हात पोलिसांना मदतीसाठी देवू केला आहे. ही मदत 'कण ते मण' अशा स्वरुपाची असल्याची चर्चा आहे. सर्वच स्तर, सर्वच पातळीवरच्या व्यावसायिकांची दिल खोल के मदत आणि इतर बाबींच्या आधारे होणारी ही आरोग्य धाव कराडच्या नावलौकिकात भर घालणारी ठरेल, असा विश्वास आहे. मग कराड तालुक्यात अमली पदार्थाची तस्करी व सेवन होते का? होत असेल तर यावर कोणतीही ठोस कारवाई आतापर्यंत का झाली नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, कराडकरांच्या आरोग्याची काळजी पोलिसांना आहे हे पाहून अनेकजण समाधान व्यक्त करत आहेत. बिघडलेले शारिरिक स्वास्थ यातून सावरेल पण बिघडत चाललेल्या सामाजिक आरोग्याचे काय हा प्रश्न देखील कृष्णा-कोयनेच्या संगमावरुन घोंघावत कराडात फिरणाऱ्या वाऱ्याने आणखी गडद केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर नक्कीच पुढाकार घेतील यात कोणतीही शंका नाही.
गतीमान झालेले कराडचे अर्थकारण, विस्तारणारी बाजारपेठ, उच्च शिक्षणाच्या तयार झालेल्या संधी मुळे देशासह परदेशातील विद्यार्थी कराडशी जोडले गेले आहेत. विविध प्रांतांतून आलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी कराडचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले असलेतरी अनेकांनी मुळ प्रांतातील चुकीच्या खाणाखुणा येथे रोवल्या आहेत. यामुळे याठिकाणी नेहमीच चांगल्या विरुध्द वाईट अशा प्रवृत्तींचा सामना रंगत असतो. कराड पोलिसांच्या नावलौकिकात भर घालणारे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली कारकिर्द गाजवली आहे. असे अधिकारी, कर्मचारी नेहमी इतर बाबी, प्रथा, रुढी आणि परंपरेची पालखी उचलूंपासून चार हात दुर रहात. अलीकडच्या काळात अशा पालखी उचलूंचा वावर थेट पोलीस ठाण्यापर्यंतच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत आणि अधिकारीही न्याहरीला उचलुंच्या घरी असे चित्र आहे.
सोम्या आला तरी तेच, गोम्या आला तर तेच, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वागत समारंभाला तेच आणि निरोपाला डोळ्यात पाणी आणत गळा काढणारे हेच. अशा पालखी उचलूंमुळे काही प्रमाणात का होईना कराड पोलिसांची नाचक्की होत आहे. ही बाब लक्षात येत असलीतरी काहीजणांची भूमिका 'तेरी मेरी यारी.... भो गेली दुनियासारी' या सदरात मोडणारी आहे. अर्थचक्राभोवती गरागरा फिरणारे हे पालखी उचलू, आपल्या हातातील खुळखुळाटावर व अनेकांना नादवत असल्याचे यापुर्वी दिसून आले आहे. कुणाला हे दे, कुणाला ते दे, कुणाला हे दे, कधी सोम्यासाठी मोठा कार्यक्रम घे तर कधी गोम्यासाठी. असे सत्र गेल्या काही दिवसांपासून पालखी उचलूंकडन कराडात सुरु आहे. पोलीस ठाण्यात तर अशा पालखी उचलूंचे वागणे महानंदी सारखेच असते. त्यांच्या वशिंडाला हात लावल्याशिवाय महादेवाकडे जाताच, येत नसल्याचेही अनेकांचे मत आहे. मतमतांतरे अनेक असतील, पण हा प्रघात, पायंडा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बंद करणे आवश्यक आहे. थोड मॅरेथॉनचा विषय सोडून अवांतर चर्चा झाली, पण ती देखील आवश्यक आहे.
अमली पदार्थ मुक्त व हेल्दी कराड' हा उद्देश ठेवून जनजागृती करण्यासाठी रविवार (दि. १९) रोजी "रन फॉर पोलीस २०२५" ही मॅरेथॉन होत आहे. शारिरिक स्वास्थ राखण्यासाठी ही मॅरेथॉन लाभदायी ठरेल...पण सामाजिक आरोग्यसाठी देखील पोलिसांनी अशीच दौड आयोजित करणे आवश्यक आहे. कराड शहरासह ग्रामीण भागातील वाढतील गुन्हेगारी, टोळी युद्ध, संघटित गुन्हेगारी, सावकारी, भाईगिरी याच्या जोडीला राजरोसपणे सुरू असलेला मटका, दारू आदींवर कोणती ठोस कारवाई झालेली दिसून आली नाही. ज्या काही कारवाया झाल्या आहेत त्या दप्तरी रेकॉर्ड पुरत्या मर्यादित करण्यात आल्याचे दिसून येते. सामाजिक शांतता आणि स्वास्थ अबाधित रहावे, यासाठीच्या उपाययोजना आत्तापासूनच पोलीस दलाने राबवणे आवश्यक आहे. त्यासाठीच्या उपाययोजना पोलिसांकडुन सुरु देखील असतील, मात्र त्या उपाययोजना 'दुख रेड्याला अन डाग पखालीला' अशा स्वरुपाच्या ठरु नयेत.
बाकी इतिवृत्तांत मॅरेथॉन नंतर...
©2025. All Rights Reserved.