पाटण : महालक्ष्मीचे आगमन होई, घरोघरी सुख-समृध्दी आणि आनंदाची उधळण होई...हासंदेश देत मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात महिलांनी घरोघरी गौराईंचेआगमन केले. गौरीच्या आगमनादिवशी पाटणची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. सायंकाळी मुली व महिला वर्गाने गौराईची पूजा करुन न्हावण आणण्यासाठी केरा नदी काठावर जावून त्याठिकाणी गौराईची गाणी सादर केली.कोरोना संकटकाळात दोन वर्षे महिलांना सामुहिकरित्या कोणतेच कार्यक्रम घेता आले नाही. त्यामुळे यंदा सर्वच ठिकाणी महिलांनी गौराईच्या आगमनात कोणतीही कसर ठेवायची नाही असा चंग बांधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवात गौराई माहेरवाशिनीच्या रूपाने सोनपावलाने घरोघरी येत असतात. शनिवारी सकाळपासूनच महिलांनी गौरींच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली होती. गौरींच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी
करण्याबरोबरच गौराईसमोर ठेवण्यासाठी गोडधोड पदार्थ खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पूर्वी सणासुदीला लागणारे गोडधोड पदार्थ स्वत:च्या हाताने तयार करून ठेवले जात होते. बदल्यात युगात रेडीमेड फराळाच्या पदार्थांना महिलांनी पसंती दिली असून यामध्ये बुंदीचे लाडू, शेव-चिवडा, करंजी, शंकरपाळी, चकली, आळुवडी, म्हैसूरपाक, गुलाबजाम, अनारस,
खव्याचे मोदक आदींसह विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.
दोन वर्षाच्या कोविडच्या काळानंतर पाटण शहरात शनिवारी दिवसभर महिलांच्या आनंदाला उधाण आले होते. नववारी साडी, नाकात नतनी, हातामध्ये चुडा, डोक्यात वेणी आदी पेहराव करून सुहासिनी महिला गौराईच्या आगमनासाठी सज्ज झाल्या होत्या. दुपारपर्यंत पाटणसह परिसरात उत्साही आनंदी वातावरणात गौराईंचे आगमन झाले. अनेक ठिकाणी गौरी सजावट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमही पार पडणार आहेत. पुढील दोन दिवस म्हणजे गौरी पूजन व सोमवारी गौरी विसर्जन असल्याने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
महिलांच्या आनंदाला उधाण
चिमटभर राख खाईन पण माहेराला जाईन या जुन्या म्हणीप्रमाणे आपल्या सासरी कितीही श्रीमंती असली तरी महिला आपल्या गरीब घर असलेल्या माहेरी येतातच. त्याठिकाणी गोड-धोड नसले तरी चटणी भाकरी आनंदात खातात. गौराईचे आगमन झाल्याने सासुरवाशिनी नटुन-थटुन दाग-दागिणे घालून मिरवताना दिसत होत्या.गौराईच्या आगमनाने महिलांच्या आनंदाला मात्र उधाण आले होते.
©2025. All Rights Reserved.